बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ते बाची (ता. बेळगाव) या दुर्दशा झालेल्या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी उचगाव फाटा येथे येत्या सोमवार दि ११ नोव्हेंबर रोजी केल्या जाणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती या मार्गावर येणाऱ्या विविध गावांच्या ग्रामपंचायतींना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात येत आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी कुद्रेमनी, तुरमुरी आणि उचगाव ग्रामपंचायतींना भेटी देऊन उपरोक्त विनंतीचे निवेदन पंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना सादर करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते राजू किणेकर, दीपक आंबोळकर, महेंद्र जाधव आदिंसह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव ते बाची या राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. गेली कित्येक वर्ष रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्या कारणामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करूनही कोणती दखल घेतली जात नसल्यामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी उचगाव फाटा किंवा मधुरा हॉटेल जवळ येत्या सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी आपल्या भागातील नागरिकांच्या हितासाठी आपण या रास्ता रोकोमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करत आहोत. आपला व आपल्या ग्रामपंचायतीचा पाठिंबा यासाठी मिळावा अशी आशा असून आपण या विनंतीला मान देऊन रास्ता रोकोमध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा करीत आहोत, अशा आशयाचा तपशील ग्रामपंचायतींना सादर करण्यात आलेल्या बेळगाव तालुका म. ए. समितीच्या निवेदनामध्ये नमूद आहे.
0 Comments