खानापूर / प्रतिनिधी
सीमाभागातील संपूर्ण मराठी भाषिकांचा १ नोव्हेंबर हा काळा दिन व सुतक दिवस म्हणून आम्ही गेली ६९ वर्ष पाळत आलेलो आहोत. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर युवा समितीच्या वतीने स्टेशन रोड खानापूर येथील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये सकाळी १० ते २ पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले व सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका समितीचे सूर्याजी पाटील होते. या सभेत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना १९५६ च्या तत्कालीन नेहरू सरकारने केलेली चूक ही विद्यमान केंद्रातील मोदी सरकारने सुधारावी व अन्यायाने कर्नाटकला जोडला गेलेला मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्राला परत करावा, असे सांगून कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांना सर्व कागदपत्रे मराठी मध्ये उपलब्ध करून द्यावीत आमच्या करातून केलेला विकास हा काही उपकार नसून तो आमचा मूलभूत अधिकार आहे. बहुभाषिक तत्वाच्या टक्केवारीनुसार मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे उपलब्ध न करून देता ती आमची एक प्रकारची संस्कृती परंपरेची गळचेपी आहे असे सांगितले. माजी सभापती सुरेश देसाई यांनी महाराष्ट्रातील निवडणुका संपल्यानंतर येणाऱ्या नवीन सरकारकडे खानापूर तालुक्यातील चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ जावे व येथील परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी सूचना केली. ज्येष्ठ नेते संभाजी देसाई यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणावा व सीमाप्रश्न सोडवून घ्यावा, तसेच जी समन्वय समिती दोन वर्षांपूर्वी नेमली होती त्या समितीतील सदस्यांचे सीमा भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे , असे न होता तात्काळ सीमा भागातील अडचणी समजून घ्याव्या असे सुचविले.
पी. एच. पाटील व राजू पाटील यांनीही या सीमा भागाकडे महाराष्ट्र राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे व विद्यमान सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून संयुक्त महाराष्ट्राचा एक तुकडा कर्नाटकात असून संयुक्त महाराष्ट्र झालाच कसा बेळगाव विना संयुक्त महाराष्ट्र अधुरा असल्याचे खडेबोल सुनावले.
शिवसेना राज्य उपप्रमुख के. पी. पाटील यांनी सुद्धा सीमावासियांची व्यथा मांडली. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील बोलताना म्हणाले, गेली ६९ वर्ष सीमा भागातील मराठी भाषिकांनी आंदोलने मोर्चे उभे केले आहेत. सीमा भागातील चार पिढ्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहेत. आमच्या वयाची पिढी वयोवृद्ध झाली असताना युवकांनी या लढ्यात सामील होऊन ही लढाई हातात घ्यावी. आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहून मार्गदर्शन करू असे आवाहन केले.
यावेळी बळीराम पाटील, दत्तू कुट्रे, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, नंदकुमार देसाई, नारायण गुरव, गजानन पाटील, विनायक सावंत, भोपाल पाटील, विशाल बुवाजी, मारुती पाटील, भोमाजी पाटील, अर्जुन केसरेकर, कल्लाप्पा पाटील, स्वागत पाटील, स्वागत पाटील, महादेव ऱ्हाठोळकर, सतिश पाटील, अजिंक्य पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments