- तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हलगा ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकाऱ्याला सूचना
खानापूर / प्रतिनिधी
मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड कोठे गेले याची सखोल चौकशी करावी तसेच २०१४ ते २०२४ पर्यंतच्या लेखा परीक्षणाचा अहवाल देण्यात यावा अशी स्पष्ट सूचना तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हलगा पंचायतीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना केली आहे.
मेरडा गावामध्ये काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेली गटार चांगल्या स्थितीत असताना देखील ती फोडून पुन्हा नव्याने गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत गावातील विष्णू जयवंत पाटील यांनी २० सप्टेंबर रोजी तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेऊन हलगा पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच तक्रारीमध्ये जुन्या गटारीतील दगड घेऊन गेल्याची तक्रार करीत यापूर्वीही अध्यक्षांनी दगड घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याची दखल घेत तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत दगड कोठे गेले त्याची सविस्तर माहिती घेऊन तपशील द्यावा तसेच गावामध्ये गटार काम आणि पेव्हर्स घालण्यासाठी किती खर्च करण्यात आला याचा फलक लावण्याची सूचना देखील केली आहे.
0 Comments