- नूतन महालक्ष्मी मंदिराचा चौकट पूजन सोहळा उत्साहात
![]() |
सुळगा (हिं.) येथील नूतन महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीचे सपत्नीक पूजन करताना क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. एन. एस. चौगुले व निमंत्रित मान्यवर |
![]() |
सुळगा (हिं.) येथील नूतन महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या चौकटीचे पूजन करताना गावातील आजी - माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व निमंत्रित मान्यवर |
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कृषीप्रधान बेळगाव तालुक्यातील सुळगा (हिं.) गावात पूर्वापार चालत आलेली अध्यात्मिक परंपरा जोपासली जात आहे. गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोणत्याही सण किंवा धार्मिक कार्यक्रमावेळी युवा वर्ग आणि ज्येष्ठांची एकजूट दिसून येते. याचाच प्रत्यय येथे सुरू असलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान येत असून सर्वांच्या सहकार्यातून उभारले जाणारे भव्य मंदिर इतर गावांसाठी आदर्शवत ठरणारे आहे, असे मत क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. एन. एस. चौगुले यांनी व्यक्त केले.
![]() |
सुळगा (हिं.) येथील नूतन महालक्ष्मी मंदिराच्या चौकट पूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. एन. एस. चौगुले |
सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सदर मंदिराच्या चौकट पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. देवस्की पंच कमिटी अध्यक्ष भावकू भैरू पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते देव - देवता, राजमाता जिजाऊ आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन, परमपूज्य भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरून, नूतन मंदिराच्या मुख्य चौकटीचे सौ. व. श्री. एन. एस. चौगुले या दांपत्याच्या हस्ते तर गाभाऱ्याच्या चौकटीचे उद्घाटन गावातील आजी - माजी सैनिक संघटनेच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य, ह.भ.प. श्री. परशराम राजाराम तुप्पट यांनी अध्यात्माचे महत्त्व विशद केले.
यानंतर कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, आजी - माजी सैनिक संघटना आणि ग्रामस्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत आणि चौगुले दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
![]() |
सुळगा (हिं.) येथील नूतन महालक्ष्मी मंदिराच्या चौकट पूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उद्योजक श्री.भाऊराव गडकरी |
याप्रसंगी बोलताना गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा उद्योजक श्री. भाऊराव गडकरी म्हणाले, हाताची पाच बोटे एकत्र आल्यानंतर जी मूठ तयार होते, त्या मुठीतील एकीचे बळ फार मोठे असते, गावाच्या विकासाठी एकत्र या संघटित व्हा, कार्य पूर्णत्वाकडे नेण्याची हीच वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
![]() |
सुळगा (हिं.) येथील नूतन महालक्ष्मी मंदिराच्या चौकट पूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना गावच्या स्नुषा सौ. स्मिता बाळासाहेब पाटील. |
यावेळी सुळगा (हिं.) गावच्या स्नुषा सौ. स्मिता बाळासाहेब पाटील म्हणाल्या, आजची स्त्री ही रांधा, वाढा, उष्टी काढा यापुरती मर्यादित राहिली नसून सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, शास्त्रज्ञ अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिलांनी यशस्वीपणे पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपूर्वी गावात झालेल्या गावात झालेल्या चौकट मिरवणूक कार्यक्रमात महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल त्यांनी कौतुक केले आणि यापुढे अशाच पद्धतीने आम्ही सर्व महिला गावातील सर्व कार्यक्रमात सक्रिय राहू अशी ग्वाही दिली. तसेच या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा दिलेला बहुमान हा केवळ माझा नसून सुळगा गावातील समस्त महिलांचा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, आणि हा बहुमान दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत मंदिराचे बांधकाम पाहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजित कलखांबकर यांनी केले. तर आभार देवस्की पंच कमिटीचे सदस्य लक्ष्मण चुडाप्पा कोवाडकर यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ व्यक्ती, महिला, पुरुष ,युवक - युवती उपस्थित होते.
0 Comments