बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सांगली येथून मालवाहू वाहनाच्या केबिनमधिल चोर कप्प्यात दडवून बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल २ कोटी ७३ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. सचिन मेनकुदळे (रा. सांगली, महाराष्ट्र) आणि मारुती मारगुडे (रा. सांगली, महाराष्ट्र) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाची नावे आहेत.
बेळगाव शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन आणि पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार आणि त्यांच्या पथकाने ही बेहिशोबी रोख रक्कम जप्त केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी सायंकाळी सांगली येथून हुबळीकडे निघालेले मालवाहू वाहन पोलिसांनी अडविले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता केबिनमध्ये बनवण्यात आलेल्या चोर कप्प्यात २ कोटी ७३ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम सापडली.कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली ही रक्कम बेनामी अवैध असल्याचे निदर्शनास येताच सीसीबी पोलिसांनी ती वाहनासह जप्त केली. या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments