खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात "मातृभाषा शाळा अभियान" राबविण्यात येत असून रविवार दिनांक २७ ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी १० वाजता खानापूर येथील श्री. शिवस्मारक सभागृहात तालुक्यातील सर्व भाषिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शाळांच्या एसडीएमसी कमिटीचे पदाधिकारी, तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून मातृभाषेच्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी विचार मंथन मध्ये सहभागी व्हावे. मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकल्या व वाचल्या तरच आपली संस्कृती टिकणार आहे. याबाबत विश्व भारती कला आणि क्रीडा संघटनेचे अभियान गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मान्यवर मंडळींचे मार्गदर्शन होणार असून पालक, शाळा सुधारणा कमिटी सदस्य ,शिक्षणप्रेमी,क्रीडाप्रेमी, विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तालुक्यातील आजी - माजी आमदार व शिक्षण तज्ञ यांची उपस्थिती राहणार आहे. 

सदर बैठक विश्वभारती कलाक्रिडा संघ उपशाखा  खानापूर यांच्या वतीने आयोजित  करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून मातृभाषेच्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी विचार मंथन अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वभारती कला क्रीडा संघ उपशाखा खानापूर यांच्याद्वारे करण्यात आले आहे.