कडोली / वार्ताहर 

कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी ५ जानेवारी ही संमेलनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र याच तारखेला येळळूर साहित्य संमेलनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे समन्वय साधत ५ जानेवारी ऐवजी १९ जानेवारीला संमेलन घेण्याचा निर्णय साहित्य संघाच्या शनिवारी (दि. १२) रात्री झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. 

बैठकीत ४० व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. अरुण पाटील यांनी स्वागत व बैठकीचा उद्देश सांगितला. संमेलनाची तारीख बदलण्यासाठी सर्वांनी संमती दिली.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी  व त्यांचे सर्व सहकारी, पाठपुरावा करणारे महाराष्ट्र सरकार व सर्व संबंधितांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच कडोली मराठी साहित्य संमेलनाला येऊन गेलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

संमेलनातील विविध सत्राबाबत चर्चा झाली. संमेलन चार सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. साहित्यिक, पाहूणे आदींबाबत कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. साहित्यिक व पाहुण्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याचे ठरले. संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, व्याख्याने, साहित्यिक उपक्रम व अन्य कांही विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

बसवंत शहापूरकर यांनी संमेलनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच या वाटचालीत सहकार्य केलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष शिवाजी कुट्रे, खजिनदार विलास बामणे, सहसचिव किशोर पाटील, सल्लागार उद्योजक अनिल कुट्रे, सुधीर कुट्रे, तानाजी कुट्रे, दीपक होनगेकर, किरण होनगेकर, रवी होनगेकर, मनिंदर देसाई, सदन संभाजी, दिलीप मायाण्णा, रमेश मायाण्णा आदींनी विविध सूचना मांडल्या. संमेलनाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी व कार्यक्रम ठरविण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे यांनी जाहीर केले. यावेळी संघाचे कार्यकर्ते  उपस्थित होते.