बेंगळूर : मुडा घोटाळा उघडकीस आल्या नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी पडद्या आडून हालचाली सुरू केल्या आहेत‌. याचवेळी मंत्री सतीश जारकीहोळी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची भेट  राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

… या भेटीमागचे नेमके कारण काय? भेटीदरम्यान कोणती चर्चा झाली? या भेटीमुळे कर्नाटकाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे का? अशा अनेक चर्चांना ऊत आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन बी. वाय. विजयेंद्र यांना आपल्या विभागासंदर्भात निवेदन सादर केले. मात्र त्यांच्या या भेटीदरम्यान तासभराहून अधिक काळ त्यांनी चर्चा केल्याचे समजते.

नुकतीच एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्ली मुक्कामी भेट घेतली. मात्र या भेटीमुळेही सोशल मीडियावर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले. यावरून राजकीय चर्चा सुरु असतानाच आज अचानक बी. वाय. विजयेंद्र आणि सतीश जारकीहोळी यांच्या भेटीचे फोटोही वायरल झाले. मात्र आता या भेटीनंतर नव्या चर्चांची भर पडली असून उभयतांच्या भेटीमुळे सोशल मीडियावर मुख्यमंत्री पद बदलाचे वारे जोराने वाहू लागले आहेत.