• उस्ते वाळपई गोवा येथील श्री राम माऊली वारकरी मंडळातर्फे स्व. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना श्रद्धांजली


पांडुरंग गांवकर / वाळपई सत्तरी (गोवा) 

सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या स्व. शट्टूप्पा (शेंदूर बाळू) पाटील सुळगा (हिं.) ग्रा. पं. सदस्य, यांचा फक्त बेळगावचं नव्हे तर नजीकचा चंदगड तालुका आणि गोवा येथेही मोठा मित्र परिवार होता. 'जनसेवा' हीच 'ईश्वरसेवा' हे ब्रीद उरी बाळगून काम करताना बाळू पाटील यांनी प्रत्येकाच्या मनात कर्तृत्त्वाची छाप निर्माण केली होती. मात्र त्यांचे अकाली निधन त्यांच्या मित्र परिवारालाही वेदना देणारे ठरले असून ही बातमी कळताचं, उस्ते वाळपई सत्तरी गोवा येथील त्यांचे चांगले मित्र पांडुरंग गांवकर (वारकरी) यांनीही श्री राम माऊली वारकरी मंडळाच्यावतीने न्यूज २४ तास मराठी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

शोक संदेशात वारकरी पांडुरंग गांवकर यांनी स्व. शट्टूप्पा (बाळू) यांच्याशी झालेल्या परिचयावर प्रकाशझोत टाकताना म्हटले आहे की, श्री राम माऊली वारकरी मंडळ - उस्ते वाळपई सत्तरी गोवा, यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखणाऱ्या माझ्या प्रिय मित्रास भावपुर्ण श्रद्धांजली. त्याच्या आत्म्यास चीर शांती लाभो अशी  ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बाळूशी माझा परिचय आषाढीवारी संदर्भात वेगवेगळ्या भागात राहण्याचे व नाष्टा करण्याचे ठिकाण शोधताना झाला. तेव्हा पासून ते आजपर्यंत तो आमच्या परिवाराचा एक भाग होता. त्याने आम्हाला कधीही परकेपणा दाखवला नाही. उलट घरच्या माणसांप्रमाणे तो आमची सेवा करायचा. आषाढ वारीला निघताना बाळूला एक फोन केला म्हणजे आमची तयारी पूर्ण केलेली असायची. त्यात त्याचा सदैव हसरा चेहरा.. नेहमी म्हणत असे, तुम्ही कधीही या मी आपलाच आहे. कशाचीही कमी होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याचप्रमाणे त्याचा प्रामाणिकपणा मनाला भावणारा होता. 

आम्ही कधी बेळगांव  किंवा त्या नजीकच्या परिसरात आलो तर आवर्जून ऑफिसमध्ये जाऊन त्याची भेट घायचो. आम्ही येतो म्हणायचा अवकाश, हाती कोणतेही काम असले तरी वेळात वेळ काढून रस्त्यावर आमची वाट पाहत तो उभा असायचा. आम्ही पोहोचताच पाहुणचारासाठी चहा व इतर खाद्य पदार्थ तयार ठेवायचा, वारीच्या दिवशी वारकऱ्यांसाठी सुळगा मुख्य मार्गावरील श्री हनुमान मंदिरात आमच्यासाठी त्याच्याकडून नाष्टा हा ठरलेला असायचा. आपली छोटीशी सेवा म्हणायचा व भावनिक व्हायचा...यंदाच्या वारीतही त्याने आम्हाला नाष्टा दिला. मात्र पंढरपूरच्या दिशेने निघताना आमची वारी सुखरूप होऊ दे यासाठी भावूक होऊन  पांडुरंगाला साकडे घालणारा बाळू अचानक आम्हाला सोडून कायमचा निघून जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वारीच्या निमित्ताने दरवर्षी सुळगा (हिं.) गावात येणे होईल पण तिथे आमचा आपुलकीने पाहुणचार करणारा माझा हक्काचा माणूस बाळू याची मात्र कायमची उणीव भासेल.

असो बाळूबद्दल बोलताना शब्दच अपुरे पडतील असे त्याचे सामाजिक कार्य होते. पण माझा चांगला मित्र व एक चांगला सामाजिक कार्यकर्ता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला, ह्याचे दुःख मात्र कायमचे मनामध्ये राहणार हे नक्की... राम कृष्ण हरी...  

शब्दांकन : श्री. पांडुरंग गांवकर (वारकरी) 

श्री राम माऊली वारकरी मंडळ

उस्ते वाळपई, सत्तरी गोवा

उस्ते वाळपई, सत्तरी गोवा येथे श्री राम माऊली वारकरी मंडळाच्यावतीने स्व. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना श्रद्धांजली वाहिली, तो क्षण.