• भाजप नेते धनंजय जाधव यांनी विचारला संबंधित अधिकाऱ्यांना जाब 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील बसुर्ते या गावामध्ये जवळपास 250 एकर जमिनीचे वेगवेगळे कारण सांगून मोजमाप करण्यास सुरवात करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे हाता तोंडाला आलेले पीक नष्ट होत आहे. सर्वेच्या नावावर उभ्या पिकातून धावपळ करत असून विविध ठिकाणी पांढरे ध्वज लावले जात असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी गावामध्ये चर्चेला ऊत आला असून या जागेवर नेमके काय केले जाणार आहे? सर्व्हे नेमका कशासाठी करण्यात येत आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

अशातच गावातील राष्ट्रीय पक्षांचे काही नेते शेतकऱ्यांच्या समूहामध्ये लाखो रुपयांचे आमिष देत याप्रकरणी मौन बाळगण्याचा सांगत असल्याचे समोर आले आहे.




यासंबंधी शेतकऱ्यांना व ग्राम पंचायतीला कोणतीही नोटीस अथवा सूचना आलेली नाही. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजप नेते धनंजय जाधव म्हणाले, शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे येथील गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व्हेसाठी आलेल्या अधिकारांची कानउघाडणी करण्यात आली असून जो पर्यंत या प्रकल्पा संबधित अधिकारी गावाच्या लोकांसोबत व शेतकऱ्यांसोबत प्रकल्पाबाबत चर्चा करून विश्वासात घेतले जात नाही तो पर्यंत सर्वेचे काम थांबवावे. एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांसोबत चर्चा न केल्यास तसेच शेतकऱ्यांच्या विरुद्ध जबरदस्तीने जमिनी कब्जा करायचा प्रयत्न करण्यात आल्यास, उचगाव क्रॉस वेंगुर्ला रोड येथे रास्ता रोको करून मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी संतप्त महिला शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, याच शेतजमिनीवर आपला उदरनिर्वाह सुरु आहे. गावातील अनेक कुटुंब देखील याच शेतजमिनीवर अवलंबून आहेत. याठिकाणी सर्व्हेचे कामकाज सुरु झाले असून कोणत्याही परिस्थितीत शेतजमिनीवर कब्जा करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी नेताजी बेनके, पवन देसाई, यतेश हेब्बाळकर, मिथील जाधव व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.