बेळगाव / प्रतिनिधी
करवसुलीत पिछाडीवर पडलेल्या बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर भरण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली असून, ११ लाख रुपयांची करवसुली बाकी आहे. दरम्यान मालमत्ता कर भरणे थकीत असलेल्या, बेळगाव मारुतीगल्ली येथील कामत हॉटेलला गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले.
यावेळी महापालिकेच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी म्हणाल्या, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार बेळगाव महापालिकेने सदर करवसुली मोहीम सुरू केली आहे. बेळगावच्या जनतेने थकीत कर लवकर भरून सहकार्य करावे. ६२ टक्के करवसुली झाली आहे. दोन महिन्यांत ४८ टक्के कर वसूल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आठवडाभरात महापालिकेचा थकीत कर न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरात मालमत्ता कर वसुली मोहिमेला सुरुवात केली. आज शहरातील बाजारपेठ परिसरात झाला कर वसुली करण्यात आली. कारवाई दरम्यान प्रचंड कर थकबाकी असलेल्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले. महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, सहायक महसूल अधिकारी अनुराधा आदींच्या पथकाने बेळगावातील बाजारपेठ परिसरात कर वसुली मोहीम राबवली.
0 Comments