- चैतन्यमय वातावरणात पहिल्या दिवशीची दौड
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री शैलपुत्रीचे पूजन करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. बेळगाव शहरात प्रत्येक सणाचे वेगळे वेगळेपण आहे. नवरात्रीच्या १० दिवसांत सकाळी श्री दुर्गामाता दौड तर रात्री दांडियाचा कार्यक्रम होतो.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून बेळगाव शहरात नवरात्री दरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. यावेळीही श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सुरू झाली. प्रारंभी एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर प्रेरणामंत्र, श्री गणेश, श्री दुर्गामाता आणि छत्रपती शिवरायांची आरती करून ध्वज चढविण्यात आला. त्याचबरोबर पहिल्या दिवशीच्या दौडला चालना देण्यात आली. श्री दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी काल रात्रीपासून महिला आणि उत्साही कार्यकर्त्यांनी दौडच्या मार्गावर सजावट केली होती. रस्ते रंगीबेरंगी रांगोळ्या आणि भगव्या ध्वजांनी सजले होते.
या दौडबाबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले, बेळगावात गेल्या २६ वर्षांपासून दरवर्षी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही दौड पार पडते. धर्म जागृतीसाठी होत असलेल्या श्री.दुर्गामाता दौडमध्ये धारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर श्री दुर्गामाता दौडचे पारंपरिक पोशाखात स्वागत करणाऱ्या धनश्री पवन जुळेकर यांनी, प्रत्येक नवरात्रीला होणारी श्री दुर्गामाता दौड प्रेरणादायी असते. आदल्या दिवशीपासून रात्री तयारी करून दौडचे स्वागत केले जाते, असे सांगितले.
पहिल्या दिवशी नियोजित मार्गावर गल्लोगल्ली सुहासिनी महिलांनी आरती करून दौडचे स्वागत केले. बाल शिवाजीसह हिंदू धर्माचा संदेश देणाऱ्या सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरू झालेली दौड श्री क्षेत्र दक्षिण कशी कपिलेश्वर मंदिरात दाखल झाली. यावेळी ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरविण्यात आला. यानंतर पहिल्या दिवशीच्या दौडीची सांगता करण्यात आली.
या दौडमध्ये भगवे फेटे - पांढऱ्या पोशाखातील शेकडो धारकरी, युवक - युवती आणि शिवभक्त सहभागी झाले होते.
0 Comments