- आधुनिक सावित्रीबाई फुले मल्लव्वा मेटी यांचे जनतेतून कौतुक
- रायबाग तालुक्यातील मंटूर ग्रा. पं. सदस्यपदी कार्यरत
रायबाग / वार्ताहर
काही महिलांनी गृहलक्ष्मीच्या पैशातून टीव्ही आणि फ्रीज घेतले. तर बेळगावातील एका वृद्ध महिलेने होळी सणानिमित्त संपूर्ण गावाला पुरणपोळीचे जेवण केले होते. तसेच अन्य एका महिलेने स्वतःच्या मुलाला दुचाकी दिली होती. पण इथे एका महिलेने गावातील मुलांच्या भवितव्यासाठी गृहलक्ष्मी यॊजनेच्या पैशातून गावात वाचनालय बांधले आणि इतर महिलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
होय, बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील मंटूर ग्रामपंचायतीच्या सदस्या मल्लव्वा भीमप्पा मेटी या महिलेने आणि ग्रा.पं.सदस्या म्हणून मिळालेले मानधन व गृहलक्ष्मी योजनेच्या मिळालेल्या पैशातून गावातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय बांधले आहे.
वाचनालयावर एकूण १.५० लाखांचा खर्च झाला आहे. मल्लव्वा भीमप्पा मेटी सुशिक्षित नाहीत मात्र त्यांच्या गावातील मुले बेंगळूरू, धारवाड, विजापूर येथे शिक्षणासाठी जातात. इथे त्यांच्या शिक्षणासाठी महिन्याला पैशाची अडचण होती. ते विद्यार्थी आता या वाचनालयात बसून अभ्यास करतात.
गावातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारण्याचे माझे स्वप्न होते. मला तेरा महिन्यांसाठी गृहलक्ष्मीच्या पैशातून २६ हजार रुपये मिळाले. त्यासोबतच मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मानधनही मिळते, हे सर्व पैसे जमा करून मी एक छोटेसे वाचनालय बांधले आहे. छोट्या वाचनालयासाठी दीड लाख रुपये खर्च आला. मात्र, गावातील मुलांनी अभ्यास करावा. त्यांना चांगली नोकरी मिळावी म्हणून हे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रा. पं. सदस्यपदी निवडून आल्यावर विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे, गावात वाचनालय उभारून मल्लव्वा यांनी त्यांच्या शब्दाप्रमाणे कृती केली आहे. गावातील मुलांनी शिकून सरकारी नोकऱ्या मिळवाव्यात, या उद्देशाने ग्रा.पं.सदस्या म्हणून मिळालेले मानधन आणि गृहलक्ष्मी योजनेच्या पैशातून मंटूर गावात वाचनालय उभारणाऱ्या मल्लव्वा यांच्या कार्याचे जनतेतून कौतुक होत आहे.
0 Comments