बेळगाव / प्रतिनिधी 

धाब्यावर जेवण करून परतताना भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाली. बेळगाव तालुक्यातील होनगा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारमधील सहा तरूण आणि कारचालक जखमी झाले आहेत. महंमद रियाज, महंमद नसिरुद्दीन, लुरामखान माडीवाले, रेहान मकानदार, महंमद उमर माडीवाले, नियाज सलाम देसाई आणि चालक विरुपक्षप्पा चित्तापूर (रा. मूळचे कोप्पळ) हे जखमी झाले आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, हत्तरगी धाब्यावर जेवण करून सहाजण कारने बेळगाव शहराकडे परतत होते. यावेळी बेळगाव तालुक्यातील होनगा राष्ट्रीय महामार्गावर कारचालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर चढली आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाली. दरम्यान यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या केएसआरटीसीच्या बस चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला असता, बसने सर्व्हिसरोड सोडून बाजूच्या वडापाव - पानशॉपमध्ये प्रवेश केला. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.