- कर्नाटक राज्य शेतकरी संघटनांची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
मलप्रभा सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार आणि घोटाळ्यांची सीबीआय चौकशीची मागणी करत कर्नाटक राज्य शेतकरी संघटनांनी संप सुरू केला आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी शहरातील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचा गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांशी वाद सुरू आहे. हा कारखाना अडचणीत अडकला असून, यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. सदर कारखान्यात सुमारे ७४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असे सांगत शेतकरी गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने लढा देत आहेत. शेतकऱ्यांना अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
या कारखान्यात झालेले सर्व घोटाळे उघडकीस आणून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, हा तपास सीबीआयकडे सोपवून येथील व्यवस्थापन मंडळ व पूर्वीच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून कायदेशीर कारवाई करावी, हा तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे सोपवावा, या कारखान्यातील शेतकऱ्यांची थकीत उसाची बिलेही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
दोषींवर कायदेशीर कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0 Comments