• आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी बेळगावात १४५ किमी मानवी साखळी  

बेळगाव / प्रतिनिधी 

विविधतेत एकसंध असलेल्या आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण भावना अभिव्यक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, त्यांच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हाच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात राज्यघटनेचे महत्व व जनजागृती करण्यासाठी शासनातर्फे आयोजित १४५ किमीच्या विशाल मानवी साखळीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज रविवारी सकाळी लोकशाही दिन साजरा करण्यासाठी  झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात शासनाच्या संविधानाची जनजागृती व महत्व निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व समाजकल्याण विभागाच्या आवारात विशाल मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय लोकशाही ही एक शक्ती जी आपल्या स्वातंत्र्य, लोकशाही, समता आणि न्यायाच्या सर्वोच्च आकांक्षांना मूर्त रूप देते. लोकशाही ही जनतेने जनतेसाठी केलेली व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त रामदुर्ग तालुक्यातील सलहल्ली ते कित्तूर तालुक्यातील तेगुर या गावापर्यंत १४५ किमी लांबीची मानवी साखळी उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

प्रारंभी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, पोलिस उपायुक्त रोशन जगदीश, समाजकल्याण विभागाचे सहसंचालक रमणगौडा कन्नोळी आदींच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी बागलकोटमार्गे बेळगावात दाखल झालेली मानवी साखळी बेळगावच्या शहरी व ग्रामीण भागातून मार्गक्रमण करत कित्तूरमार्गे धारवाडमध्ये दाखल झाली.  या कार्यक्रमात विविध शाळा-महाविद्यालयांतील लाखो मुले, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि विविध संघटना व संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.