- हुक्केरी तालुक्यातील घटना : अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक
- जिल्हा पोलिस अधिक्षक भीमाशंकर गुळेद यांची माहिती
हुक्केरी / वार्ताहर
वैयक्तिक वैमनस्यातून होसूर (ता. हुक्केरी ; जि. बेळगाव) येथे फिल्मी स्टाईलने कारमधून दुचाकीचा पाठलाग करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. यमकनमर्डी पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. विठ्ठल जोत्याप्पा रामगोनत्ती (वय ६०, रा.होसूर ता. हुक्केरी ; जि. बेळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
- सिद्धप्पाच्या हत्येचा कट...पण दुर्दैवाने विठ्ठलची हत्या :
होसूर गावात जमिनीच्या वादातून सिद्धप्पा नामक व्यक्ती आणि आरोपीच्या कुटुंबियांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर गावातील एका मंदिरात रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर सिद्धप्पा आणि मयत विठ्ठलसह काही जण दुचाकीवरून घराकडे निघाले. यावेळी आरोपींनी दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीचा कारसह पाठलाग करून सिद्धप्पाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कारने दुचाकीला धडक दिली. मात्र या प्रयत्नात सिद्धप्पा बचावला आणि त्याच दुचाकीवरील विठ्ठलचा हकनाक बळी गेला. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आला असून यमकनमर्डी पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे.
- अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक :
या घटनेनंतर बेळगावचे जिल्हा पोलिस अधिक्षक भीमाशंकर गुळेद यांनी विठ्ठलच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांत यमकनमर्डी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे.
0 Comments