• बेळगाव महात्मा फुले रोड येथील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचाऱ्याला बोलेरोची धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बेळगाव शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी ७ वा. सुमारास ही घटना घडली. श्रीधर पवार (वय ४२ रा. संतसेना रोड, बेळगाव) असे या मृत पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, श्रीधर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला गेले होते. रस्ता ओलांडण्यासाठी ते दुभाजकाजवळ थांबले होते. त्यावेळी गोवावेसकडून बँक ऑफ इंडियाकडे महात्मा फुले रोडवरून जाणाऱ्या बोलेरो गाडीने दुभाजकाला आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या श्रीधर यांना जोराची धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दक्षिण विभाग रहदारी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मयत श्रीधर हे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर काम करत होते.