बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील ईद-ए-मिलाद मिरवणुक संपवून परतताना रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे  रूपांतर हाणामारी व तलवार हल्ल्यामध्ये होऊन त्यात चौघेजण जखमी झाले. मोहम्मद कैफ, साहिल बंडारे, तन्वीर व अहमद अशी या तलवार हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटनेनंतर जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रविवारी शहरामध्ये आयोजित ईद-ए-मिलाद मिरवणूक आटोपून घरी परतणाऱ्या रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील युवकांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. विद्युत दिव्यांच्या नुकसानाच्या मुद्द्यावरून हे भांडण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे संबंधित भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी माळ मारुती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.