दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. त्यानंतर आता १७७ दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आल्याने केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीत मद्य धोरणात घोटाळा करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयकडून केजरीवाल यांना अटक करण्यात आली. या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा दोन स्वतंत्र याचिकांवर आज सुनावणी पार पडली. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भूयां यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता.

  • १७७ दिवसांपासून केजरीवाल जेलमध्ये

यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल जाहीर केला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या १७७ दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये आहेत. आता १० लाख रुपयांच्या जात मुचालक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.