• चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यासोबत बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

महाराष्ट्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अतिरिक्त जलसाठे बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ सीमावर्ती भागातील बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होईल. नवीन जलाशयांमुळे सीमेवर १२ महिने पाणी उपलब्ध होणार आहे. 

सीमेवर जलाशय बांधण्यासंदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव सर्किट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. तिलारी जलाशयाजवळ आणखी एक जलाशय बांधल्यास त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. मार्कंडेय नदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही यामुळे मदत होणार आहे. याआधीही माजी नगर सेवकांनी प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही बैठक झाली.  

शेतकऱ्यांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोणत्याही भागातील शेतकरी जलाशयामुळे एकत्र येऊन शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात. त्यासाठी ३ टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यावे. पाठीचा कणा असलेला शेतकरी जागृत झाला तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

तर बेळगाव उत्तरचे माजी आमदार तथा भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही अतिरिक्त जलाशय निर्माण करण्याच्या कामाला लवकरात लवकर चालना द्यावी अशी मागणी केली. यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी  या मागणीची निश्चितपणे दखल घेतली जाईल. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाईल. यानंतर दोन्ही सरकारने मान्य केल्यास लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीला कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस.मेत्री, अविनाश फडतरे, स्वाती उरणकर आदींचा सहभाग होता.