• पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांची माहिती  

बेळगाव / प्रतिनिधी

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी  शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी पोलिस विभागासोबत प्राथमिक बैठक घेऊन महत्त्वपूर्ण सूचना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.

बेळगावात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव मंगळवारी संपणार असून, शहरात पोलिस विभागाचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी एकूण 6 पोलीस अधीक्षक, 31 उप अधीक्षक, 109 निरीक्षक, 130 सहायक उपनिरीक्षक, 200 हवालदार, 562 होमगार्ड, केएसआरपी तुकडी तैनात करण्यात येणार आहे. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या, संवेदनशील, अतिसंवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला आहे. तसेच दररोज गस्त घालण्यात येत आहे. संपूर्ण शहरात 517 पॉझिटिव्ह कॅमेरे बसविण्यात आले असून विसर्जनाच्या वेळी व्हिडीओ कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांच्या ईद-मिलाद निमित्त आयोजिण्यात येणारी मिरवणूक पुढे ढकलण्याच्या कल्पनेचे त्यांनी स्वागत केले आणि बेळगावात सर्व सण शांततेत पार पडतील, अशी आशा व्यक्त केली. या बैठकीस विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.