बेळगाव / प्रतिनिधी
तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी बेळगाव शहरातील बाजारपेठ राख्यांनी अगदी सजून गेली आहे. यंदाही बच्चे कंपनीमध्ये कार्टूनच्या राख्यांची क्रेज अधिक असून अमेरिकन डायमंड, कोलकाता राखी तसेच कुंदनच्या राख्यांना पसंती दिली जात आहे.
भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ करणारा रक्षाबंधन सण सोमवार १९ ऑगस्ट रोजी असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी राख्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पेक्षा यंदाही राख्यांच्या किमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अँग्री बर्ड, मोटू -पतलू, डोरेमॉन, मिकी, छोटा भीम, कृष्ण, बाल गणेशा अशा विविध प्रकारच्या कार्टून्स राख्याही बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
या राख्या ५ रुपयांपासून अगदी ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बांधणीचा धागा आणि मोतीचे वैशिष्ट्य असलेल्या कोलकाता राख्यांमध्ये जवळपास ५० हून अधिक प्रकार आहेत. चंदन, तुळशीमणी, कुंदन, राजस्थानी, स्टोन राख्या अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात आल्या असून या परराज्यातून मागवल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.
0 Comments