बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव उत्तर जिल्ह्याची  निर्मिती माझ्या हातात नाही, तो निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असे बेळगाव जिल्हापालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. जिल्हा क्रीडांगणावरील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानंतर बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, राज्यातील सर्व विभागांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. शिक्षण,रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून आमचे सरकार आणखी चार वर्षे कायम असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

बेळगाव उत्तर जिल्ह्याची निर्मिती माझ्या हातात नाही, सरकारला याबाबत निर्णय घ्यायचा आहे, ८ लाख लोकसंख्या आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणार आहे, तरी थोडी प्रतिक्षा करावी लागेल, आम्हीही दबाव टाकत आहोत, असे ते म्हणाले.

बेळगाव जिल्ह्यात नवीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागेचा शोध सुरू आहे. ३० एकर जागा मिळाल्यानंतर ते बांधण्याचा विचार आहे, बेळगावात मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन होणार आहे, त्यासाठी कर्मचारी भरती सुरू आहे. खानापूर येथील मल्टी हॉस्पिटलचेही उद्घाटन होणार आहे. राज्यात काँग्रेसच्या हमीभाव योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.