• सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा
  • व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; वनविभागाचा निर्णय 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावी तालुक्यातील कोंडुसकोप्पनजीक यरमाळ गावात वाघ आणि बिबट्या संकरित जातीचा प्राणी दिसल्याची अफवा उठविण्यात आली असल्याची  महत्त्वाची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बेळगाव शहरात बिबट्या, हत्ती आणि जंगली प्राणी वारंवार दिसू लागले असून त्याचा लोकांना त्रास होत आहे. आता अर्धा वाघ, अर्धा चित्ता कलर हायब्रीडचा व्हिडीओ बनवून वाघ दिसल्याचे सांगत सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

बेळगावातील कोंडुसकोप्पजवळ वाघ आल्याची खोटी अफवा पसरवून वाघाच्या धावपळीचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.  तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता, मिश्र जातीचा वाघ पळून जात असल्याच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाघाचा कोणताही मागमूस सापडला नाही.

वाघ आला असल्याच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये वाघाच्या शरीराच्या वरच्या बाजूला बिबट्याचे पाय आहेत. एडिट करून ते व्हायरल करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काळजी करू नये. काल एक रान मांजर दिसले असून त्याला पकडून जंगलात सोडण्यात येईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.