बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी आदर्श प्राथमिक शाळेमध्ये देणगीदारांच्या देणगीतून साकारलेल्या स्वयंपाक खोलीचा उद्घाटन समारंभ आज बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला.
एस्.डी.एम्.सी.अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास उद्घाटक म्हणून अनंत ना. पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य सतीश बाळकृष्ण पाटील आणि येळ्ळूर केंद्राचे केंद्रप्रमुख महेश जळगेकर उपस्थित होते. नव्या स्वयंपाक खोलीचे अनंत ना. पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी शाळेची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून त्यानी शाळेला आणखी 51 हजार रु. ची भरघोस देणगी जाहीर केली. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे माजी ग्रा.पं. अध्यक्ष व सदस्य सतीश पाटील आणि महेश जळगेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेची स्वयंपाक खोली बांधण्यासाठी विविध मान्यवरांनी देणगी दिली होती. अनंत ना. पाटील, सायली बिल्डिंग अँड लँड डेव्हलपर वडगाव यांनी खोलीची फरशी, सचिन कृष्णा घाडी यांनी चौकट, सुरेश नारायण काकतकर यांनी खोलीचा रंग, बसवराज सुतार यांनी खोली बाहेरील भिंतीचा रंग, कीर्तीकुमार श्रीराम माने यांनी इलेक्ट्रिक मटेरियल, विपुल भाऊराव पाटील यांनी संपूर्ण वायरिंग, चांगदेव शिवाजी मुरकुटे यांच्याकडून खिडकीचे ग्रील अशा विविध देणगीदारांच्या देणगीतून ही स्वयंपाक खोली साकारण्यात आली. या सर्वांसह अन्य देणगीदारांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस्.बी. पाखरे, प्रारंभी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत श्रीमती एम. एस. मंडोळकर यांनी, तर प्रास्ताविक वरीष्ठ मुख्याध्यापक आर. एम्. चलवादी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार श्रीमती ए. वाय.मेणसे यांनी केला. शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती एस्. आर. निलजकर यांनी केले. समारंभास एस्.डी.एम्.सी. उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.