• तात्काळ सुटका न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

बेळगाव / प्रतिनिधी 

वादग्रस्त विधान करून फरार झालेले मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अझहारी यांच्या अटकेचा निषेध करून, त्यांची तात्काळ सुटका करावी, या मागणीसाठी बेळगावात मुस्लिम संघटनांकडून निदर्शने करण्यात आली.

बेळगावच्या मुस्लिम संघटनांच्यावतीने शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. गुजरातमधील जुनागड येथे झालेल्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जुनागड पोलिसांनी मुफ्ती सलमान अझहारी आणि त्यांच्या दोन संघटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नोंदवण्याच्या पार्श्वभूमीवर, गुजरात एटीएस पोलिसांनी यापूर्वी दोन आयोजकांना अटक केली होती. मात्र, यावेळी मुफ्ती सलमान अझहारी फरार झाले होते. त्याना गुजरात एटीएसने विक्रोळी भागातून उचलून घाटकोपर पोलिस स्थानकाच्या ताब्यात दिले. अल्पसंख्याक धर्मगुरूला फिरवून अटक करणे हे प्रकरण त्रासदायक आहे. त्यांना तात्काळ सोडले नाही तर रस्त्यावर उतरून उपोषण करू, असा इशारा नगरसेवक मुज्जमिल डोणी यांनी दिला.

आता गुजरातमधील भाजप सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे. मुफ्ती सलमान अझहारी यांचे इस्रायलबाबतचे वक्तव्य हे वादग्रस्त विधान म्हणून चित्रित करण्यात आले आहे. मुफ्ती सलमान अझहारी यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात राजकारण न करता सर्वांनी आवाज उठवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.