बेळगाव / प्रतिनिधी 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सोमवारी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित बेळगाव जिल्ह्यातील विविध भाग आणि काळजी केंद्रांना भेट दिली आणि पाहणी केली.

सांबरा विमानतळ येथून ते वाहनाने गोकाकला पोहोचले. मुसळधार पावसाने ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीवरील लोळसूर पूल पाण्याखाली गेला आहे.त्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी आदि उपस्थित होते. 

यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोकाक शहर परिसरातील जुना भाग, मटण मार्केट, कुंभारगल्ली, उप्पारगल्ली, भोज गल्ली आदि भागासह आठवडाभरापासून पाण्याखाली गेलेल्या भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

संकेश्वर - यरगट्टी राज्यमार्गावरील पूल जुना असून दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे.  त्यामुळे अधिक उंचीचा पूल बांधण्याची गरज असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.