बेळगाव / प्रतिनिधी
नानावाडी येथील नाल्यामध्ये मागील दोन दिवसापासून पडलेल्या रेडकाला जीवदान देण्यात आले. त्यासाठी स्थानिक गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षाचालक सदस्यांनी पुढाकार घेतला. नानावानडी येथील नाल्यामधून सध्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतो आहे. त्यातच चुकून एक रेडकू पडले होते. सदर रेडकाला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तसेच त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाला बोलविण्यात आले. महानगरपालिका आणि अग्निशामक दलाच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेऊन सदर रेडकाला बाहेर काढले. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. नानावाडी येथे असलेल्या स्थानकातील सदस्य महेश सावंत यांच्यासह गॅरेज चालक विजय गोडसे, आकाश खांडेकर यांनी पुढाकार घेऊन सदर मोहीम यशस्वी केली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी कोरवी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर नाला हा उघड्या स्वरूपात असल्यामुळे या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. काही दुचाकीस्वार देखील नाल्यामध्ये पडले आहेत. तरी याची गंभीर दखल घेऊन मनपाने सदर नाला योग्य पद्धतीने बांधकाम करून झाकण्यात यावा अशी मागणी केली आहे.
0 Comments