- पूर व्यवस्थापन यंत्रणेचा घेतला आढावा
बेळगाव / प्रतिनिधी
शेजारील महाराष्ट्र आणि संपूर्ण जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. सूतगट्टीजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ नदीतील पाण्याची आवक आणि सध्याची पाण्याची पातळी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच संकेश्वर शहरात जाऊन संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या भागांची पाहणी केली. मोहम्मद रोशन यांनी मागील पुराच्या वेळी उद्भवलेल्या समस्यांबाबत चर्चा करून संभाव्य पुराचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सखल भागातील पूल पाण्याखाली गेल्यावर लोकांनी ते ओलांडू नये यासाठी सूचना देणारे फलक आणि बॅरिकेड्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी हुक्केरी तहसीलदार मंजुळा नायक यांनी २०१९ च्या पूरस्थितीत स्थापन केलेल्या काळजी केंद्रांप्रमाणेच काळजी केंद्रांची यादी आधीच तयार करण्यात आली आहे आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चिक्कोडी तालुक्यातील मांजरी पुलाजवळ कृष्णा नदीचा प्रवाह पाहिला. येडूर गावाजवळील कृष्णा नदीत बोटीतून प्रवास करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत लोक आणि गुरांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. शेजारील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. नदीच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आपत्कालीन कारवाई करण्यासाठी बोटीसह आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
- जिल्ह्यात पुराचा धोका नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात पूरस्थिती नाही. मात्र, सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी २६ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास कारवारहून जादा बोटी आणल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी बसवराज संपगावी, तहसीलदार कुलकर्णी यांच्यासह महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments