बेळगाव / प्रतिनिधी

"युगे अठ्ठावीस" विठेवर उभा राहून भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या, सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज पंढरपुर येथे आषाढी एकादशी सोहळा संपन्न होत असतानाच बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात आज आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. 

बेळगाव तालुक्यासह शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी मंदिरांमध्ये रूढी आणि परंपरेनुसार शास्त्रोक्त पूजा - अर्चा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विठ्ठल मंदिरात गर्दी करून विठुरायाचे दर्शन घेतले. रांगेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. आषाढीनिमित्त दिवसभर विठ्ठल मंदिरांमध्ये जन, संकीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान बेळगावच्या विविध भागातील हजारो भाविकांनी खडेबाजार येथील विठ्ठल - रूक्मिणी मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. स्त्री व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. आषाढी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच विठ्ठल - रुक्मिणीच्या मूर्तींना सुशोभित करण्यात आले होते. गळ्यात तुळशीमाळ व पीतांबर आदी वस्त्रांनी मूर्ती सजविण्यात आली होती.

यावेळी मंदिराचे पुजारी अनंत कुलकर्णी म्हणाले, आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून हरिनामाचे पठण केले तर चांगले फळ मिळते. वर्षातील २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशी ही उत्तम असते, त्यामुळे पहाटे ४.३० वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे, भक्तांना रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे असे त्यांनी सांगितले.  

याप्रसंगी दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने सांगितले की, आम्ही दरवर्षी आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी करतो, यादिवशी आम्ही उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी देवाची प्रार्थना करून उपवासाची सांगता करतो.

आषाढी निमित्त शहरातील शहापूर ,खडेबाजार येथील नामदेव - देवकी विठ्ठल मंदिर, शहापूर विठ्ठलदेव गल्लीचे विठ्ठल मंदिर, वडगाव येथील ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. याशिवाय अनगोळ आणि तालुक्यातील  येळ्ळूर, राजहंसगड, धामणे, हिंडलगा, सुळगे (हिं.), उचगाव, कंग्राळी (खुर्द) आदी भागातील विठ्ठल मंदिरेही विठु नामच्या जयघोषाने दुमदुमली. 

एकंदरीत बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.