बेळगाव / प्रतिनिधी 

एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या सुधारणेसाठी होत असलेले प्रयत्न, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, सोयी, उपचार पद्धती या सर्वच गोष्टींचा दर्जा सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या नेहमीच्याच समस्या यामुळे नागरिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नेहमीच ताशेरे ओढत असतात. आज येथील ओपीडी काउंटरसमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची आणि नातेवाईकांची गैरसोय झाली. लहान मुलांसमवेत आलेल्या पालकांना कित्येक वेळ ताटकळत उभे राहावे लागले. 

जिल्हा रुग्णालयात बेळगाव शहर आणि तालुक्यासह परगावचेही अनेक नागरिक उपचारासाठी येतात. उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी ॲडमिशन फॉर्म भरणे अनिवार्य असते. मात्र यासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागते. ही बाब नेहमीचीच झाली आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी आणखी काही तांत्रिक अडचणी यामुळे येथील काउंटरवर नेहमीच नागरिकांची झुंबड उडते. तासनतास रांगेत उभे राहावे लागल्यामुळे आपापसात वादावादीचेही प्रसंग घडतात. आजदेखील असाच प्रकार निदर्शनात आला असून पावसाचे पाणी ओपीडी काउंटरसमोर साचल्याने नागरिकांकडून जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत होते. विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे आज जिल्हा रुग्णलयातील असुविधेमुळे मोठे हाल झाले. सकाळपासून रांगेत उभे राहून वैतागलेल्या अनेक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाच्या या सावळ्या गोंधळावर संताप व्यक्त केला.