बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील धामणे  गावात काही अज्ञातांनी घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकींना आग लावून पळ काढला. गुरुवारी रात्री घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

एकीकडे शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे धामणे गावात मात्र कुलूपबंद वाहनांना आग लावून पळ काढल्याच्या घटना समोर येत आहेत.

सुनील बस्तवाडकर या रहिवाशांच्या घरासमोरील वाहनांना आग लावण्यात आली असून या घटनेबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना सुनील बस्तवाडकर म्हणाले, काल रात्री काही अज्ञातांनी आपल्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना आग लावून पळ काढला आहे. धामणे गावात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे कष्टकरी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामीण पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, तसेच अशी कृत्ये करणाऱ्या समाजविघातकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडलेल्या या घटनेनंतर येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले असून पोलिसांनी त्वरित अशा घटनांच्या मागील अज्ञातांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.