बेळगाव / प्रतिनिधी 

राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी देखरेख समितीने पीसी आणि पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा टाकला. मुदलगी येथील इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. कुतेझुल्ला कुब्रा लिंग तपासणी करत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

तुकाराम भीमप्पा खोत नावाच्या एजंटकडून आतापर्यंत सुमारे ७० ते ८० गर्भवती महिलांची लिंग चाचणी करण्यात आली आहे. २० महिलांना मुदलगी येथील एस. एस. पाटील हॉस्पिटल आणि इतर महिलांना ममदापूर येथील सिद्धार्थ पुजारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये त्यांची लिंग तपासणी करण्यात आली. या प्रकरणी एजंट तुकाराम भीमाप्पा खोत याच्याकडून रोख १,०८,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्याच्या फोन पे अकाउंटमध्ये २० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते, जे छाप्या दरम्यान सापडले. 

या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि एजंटकडून जप्त केलेली रक्कम पुढील तपासासाठी बेळगाव जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.