गोकाक / वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यासह पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी ओसंडून वाहत आहे. घटप्रभा नदीच्या पाण्यामुळे गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. फेसाळलेल्या दुधाप्रमाणे भासणारे धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत साठवण्यासाठी पर्यटक सज्ज झाले आहेत.
गोकाक शहरापासून हा धबधबा दहा कि.मी. अंतरावर आहे. खडकांमधून वाहत येणारे पाणी १७० फूट उंचीवरून कोसळते. कर्नाटकातील दुसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा हा प्रेक्षणीय असा असून पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सध्या हा धबधबा पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी खुणावत असून हळूहळू धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत.
0 Comments