• जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पत्रकार परिषदेत माहिती  

बेळगाव / प्रतिनिधी 

सुलतानपूर (ता. हारूगेरी) येथील इराप्पा चौगुला हत्येप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. 

या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, सुलतानपूर (ता. हारूगेरी)  गावातील इराप्पा चौगुला ४ जून रोजी बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. मात्र बागलकोट जिल्ह्यात तो मृतावस्थेत आढळून आला. बागलकोट जिल्ह्यातील बेलगी पोलिस स्थानकाच्या हद्दीत इराप्पा याचा मृतदेह फेकून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर  पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास केला असून खून करणारा इराप्पा याचा भाऊ श्रीशैल चौगुला याच्यासह या प्रकरणातील अन्य ८ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

जमिनीवरून भावांमध्ये वारंवार भांडणे होत होती. इराप्पा आणि श्रीशैल यांच्यात एक एकर जमीन विकण्यावरून वाद झाला. ही जमीन विकायची नाही असा  श्रीशैलचा निर्णय होता, तर इराप्पाला ती जमीन विकायची होती. अखेर जमीन विकण्यावरून झालेला हा वाद विकोपाला गेल्याने श्रीशैल याने साथीदारांच्या मदतीने  इराप्पाचा काटा काढला. या प्रकरणी श्रीशैल चौगुला याच्यासह अन्य ८ जणांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.