- बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे करण्यात आला सत्कार
बेळगाव / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव लोकसभा मतदारसंघातून १ लाख ७१ हजारांच्या मताधिक्याने आपला विजय झाला. यामध्ये बेळगाव दक्षिणप्रमाणेच ग्रामीण मतदारसंघातूनही मला आघाडी मिळाली. तेव्हा येथील जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे उद्गार बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी काढले. शुक्रवार दि. १४ जून रोजी बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे विजयनगर (हिंडलगा) येथे आयोजित सत्कार समारंभा दरम्यान ते बोलत होते.
व्यासपीठावर बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामीण भाजपचे उपाध्यक्ष युवराज जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, यल्लेश कोलकार, दादागौडा बिरादार, गुळाप्पा होसमनी, हिंडलगा ग्रा. पं. माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नागेश मन्नोळकर, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर, नगरसेविका वीणा विजापुरे, भाग्यश्री कोकितकर, आर. एस. मुतालिक, राजेश देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी पंकज घाडी यांच्या वैयक्तिक गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प आणि भाजप पक्षाचा शेला देत स्वागत करून मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यक्रमस्थळी खासदार जगदीश शेट्टर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी केली. सर्व विधानसभा मतदार संघासह गोकाक आणि अरभावी मधूनही आघाडी मिळाल्यामुळे आपला विजय झाला, असे ते म्हणाले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन हा सत्कार फक्त माझा नसून माझ्या विजयात सिंहाचा वाटा असलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना मिळालेल्या पाठिंब्याप्रमाणेच आपल्यालाही पाठिंबा मिळाला, पैशाचे बळ या निवडणुकीत काहीच कामी आले नाही, माझा विजय हा जनशक्तीचा धनशक्तीवर झालेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बेळगाव - कित्तूर - धारवाड रेल्वे मार्ग, रिंगरोड, बायपास या प्रकल्पांशी संबंधित कामांना गती देणार आहे. बेळगावला कर्नाटकची उपराजधानी असे म्हटले जाते, त्यानुसार बेंगळूरनंतर बेळगावला आदर्श बनवण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणार अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांनी मी स्थानिक उमेदवार नसून परका असल्याच्या अनेक वल्गना केल्या होत्या. जनतेने त्या विरोधकांना मतदानातून धडा शिकवला आहे, असा टोला त्यांनी हाणला. तसेच यापुढे येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, एकीकडे हिंदुत्व, विकास आणि दुसरीकडे पैसे व अमिषांच्या जोरावर निवडणूक लढवली जात होती. मात्र सुज्ञ जनतेने भविष्याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी हिंदुत्व आणि विकासाला प्राधान्य देत जगदीश शेट्टर यांना निवडून आणले. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या विजयाची नांदी तर विरोधकांना चपराक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपची विजयी परंपरा कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून पुढील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी ग्रामीण भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नागेश मन्नोळकर, आर. एस. मुतालिक, माजी आमदार मनोहर कडोलकर, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मान्यवरांचे मनोगत झाल्यावर बेळगाव ग्रामीण भाजपच्यावतीने शाल, पुष्पहार व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रदान करून नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विविध गावातून आलेले भाजपचे पदाधिकारी - कार्यकर्ते, विविध सेवाभावी संघटना, हिंदुत्ववादी संघटना, माजी सैनिक संघटना यांनी नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात बेळगाव ग्रामीण भाजपचे उपाध्यक्ष युवराज जाधव यांनी गत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी एक स्वतंत्र स्वीय सहाय्यक (पी.ए) ची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी नूतन खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धू हुक्केरी तर आभारप्रदर्शन बसवराज दमंनगी यांनी केले. या कार्यक्रमाला बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकर्ते, भाजप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments