• कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेची मागणी 
  • जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात छेडले आंदोलन  

बेळगाव / प्रतिनिधी 

आधीच दुष्काळामुळे अडचणीत आलेले जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदार उसाचे पैसे देत नसल्याने आता आणखी संकटात सापडल्याचा आरोप कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी यांनी केला.

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने द्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. आंदोलनाला उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांच्या मालकीच्या हिरा साखर कारखान्यात  शेतकऱ्यांची ९० कोटींची थकबाकी असल्याच्या विरोधात संताप व्यक्त केला. या दरम्यान पोलिस आणि शेतकरी यांच्यात वादावादीही झाली. 

यावेळी शेतकऱ्यांनी थकबाकी असलेल्या साखर कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ थकबाकी भरण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. 

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादकांचे ६०० ते ७०० कोटी रुपये थकीत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांना संकेश्वर येथील हीरा साखर कारखान्याकडून ९० कोटी मिळणे आवश्यक आहे, त्यांनी ६-७ महिने ऊसाची थकबाकी भरलेली नाही. असे त्यांनी सांगितले. 

राज्य शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक म्हणाले, राज्यातील साखर कारखाने ऊसाचे पैसे सोडत नाहीत, हिरा साखर कारखान्याकडून किमान ८४ कोटी रुपये  आले पाहिजेत, रमेश कत्ती डीसीसी बँकेचे अध्यक्ष तर निखिल कत्ती हे आमदार होते. मग पैसे कसे  मिळत नाहीत असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच एमके हुबळी साखर कारखान्याकडून १० कोटी आले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. 

आंदोलनात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी, प्रकाश नाईक यांच्यासह शेकडो शेतकरी नेते सहभागी झाले होते.