- इंग्लंडवर ६८ धावांनी दणदणीत विजय
- अक्षर - कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचे लोटांगण
- टी - २० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य सामन्यातील पराभवाचा घेतला बदला
गयाना : टी - २० वर्ल्ड कप २०२४ ची दुसरी सेमी फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडली. भारतानने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ७ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला पराभूत करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होईल. भारताने इंग्लंडला १०३ धावांवर बाद करत ६८ धावांनी विजय मिळवला. अखेर भारताने २०२२ च्या टी- २० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच देखील उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. भारताने २० ओव्हरमध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १७१ धावा केल्या. रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. आज मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहली याने टॉप्ली याला षटकार मारल्या नंतर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात ९ धावा काढून बाद झाला. रिषभ पंत देखील केवळ ४ धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भागिदारी केली. रोहित शर्माने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने देखील ४७ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने २३ धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. शिवम दुबे शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने १७ तर अक्षर पटेलने १० धावा केल्या. इंग्लंडकडून जॉर्डन याने ३ विकेट घेतल्या.
भारताने विजयासाठी इंग्लंडपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. अक्षर पटेलने जोस बटलरच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बटलरने २३ धावा केल्या .जसप्रीत बुमराह याने फिल सॉल्टला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्षर पटेल याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद करून तिसरा धक्का दिला. अक्षर पटेल याच्या बॉलिंगवर इंग्लंडने आणखी एक विकेट गमावली. मोईन अली रिषभ पंतच्या सतर्कतेने यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने सॅम करनची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रुक याने २५ धावा करत इंग्लंडच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र एकदा जीवदान मिळून देखील तो कुलदीप यादव पुढे टिकू शकला नाही. कुलदीपने ब्रुकचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने ख्रिस जॉर्डनला १ रनवर बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले. जसप्रीत बुमरहाने इंग्लंडची शेवटची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
0 Comments