• बेंगळूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर १३ जणांचा अपघाती मृत्यू 
  • खासगी वाहनाची ट्रकला धडक बसल्याने अपघात 

हावेरी : बेंगळूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर बागडी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू झाला. चालकाला झोप आल्याने भाविकांच्या खासगी वाहनाची  राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने ही घटना घडली. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये वाहनातील ७ महिलांसह १३ जणांचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परशुराम (वय ४५), भाग्या (४०), नागेश (५०), विशालाक्षी (४०), अर्पिता (१८), सुभद्राबाई (६५), पुन्या (५०), मंजुळाबाई, चालक आदर्श (२३), मानस  (२४), रूपा (४०), मंजुळा (५०) (सर्वजण रा. एमेहट्टी ता. भद्रावती, जि. शिमोगा) अशी मृतांची नावे आहेत. 

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, अपघातातील मृत नागेश हे एमेहट्टी गावातील शेतकरी आहेत. नागेशची पत्नी विशालाक्षी या आशा कार्यकर्त्या होत्या. विशालाक्षीचाही या घटनेत मृत्यू झाला. नागेश आणि विशालाक्षी यांचा मुलगा आदर्श याने नवीन टेम्पो ट्रॅव्हलर वाहन घेतले होते. त्या वाहनाची पूजा करण्यासाठी गेलेले हे कुटुंब सोमवारी दुपारी १२ वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथील मायाम्मा मंदिरात गेले. तेथे वाहन पूजा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र तुळजा भवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे आल्यानंतर येथील यल्लम्मा (रेणुका) देवीचे दर्शन घेऊन गावी परतताना हा अपघात झाला. 

  • आयएएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू : 

भद्रावती तालुक्यातील एमेहट्टी येथील मानस, जिने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले, तिचा आई भाग्यम्मासह मृत्यू झाला ही शोकांतिका आहे. २५ वर्षीय मानस हिने आंध्रप्रदेशच्या राज्य फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. तिची  भारतीय संघातही निवड झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय, तिचे आयएएस करण्याचे स्वप्न होते. जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा होती, असे बोलले जात आहे. मानससह एमेहट्टी गावातील १३  जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. तर नातवाच्या आठवणीने आजी रत्नाबाईंनाही अश्रू अनावर झाले.