- डॉक्टरसह पाच जणांना अटक
- माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
प्रेमसंबंधातून जन्मलेले अर्भक विक्रीचा प्रयत्न करणाऱ्यांचा बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
महादेवी ऊर्फ प्रियांका बाहुबली जैनर (रा. नेगीनहाळ, ता. बैलहोंगल), डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (मूळ रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती, सध्या रा. सोमवार पेठ, कित्तूर), चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (रा. तुरकर शिगेहळ्ळी, ता. बैलहोंगल), पवित्रा सोमाप्पा मडीवाळकर (रा. संपगाव, ता. बैलहोंगल) व प्रवीण मंजुनाथ मडीवाळकर (रा. होसट्टी, ता. जि. धारवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले एक महिन्याचे अर्भक डॉक्टरसह काहींनी विकण्याचा प्रयत्न केला. कंपाऊंडर व डॉक्टरने ते ६० हजारांना विकले, तर ज्या नर्स महिलेने ते विकत घेतले तिने ते दीड लाखाला बेळगावात आणून तिसऱ्याला विकण्याचा प्रयत्न केला. यावेळी माळमारुती पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले असता तिने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की या घटनेतील पवित्रा व प्रवीण या प्रेमीयुगुलाला प्रेमसंबंधातून महिन्यापूर्वी मुलगी झाली. पवित्राची प्रसूती कित्तूर येथील डॉ. अब्दुलगफार यांच्या रुग्णालयात झाली. हे बाळ आपल्याला नको असल्याचे पवित्राने सांगितले. त्यामुळे येथील कंपाऊंडर चंदन याने ते विकण्याचा निर्णय घेतला. पूर्वी नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महादेवी ऊर्फ प्रियांका हिला महिन्याचे अर्भक अवघ्या ६० हजारांना कंपाऊंडरने विकले. ही रक्कम कंपाऊंडर व डॉक्टरने प्रत्येकी निम्मी वाटून घेतली.
- महादेवी जाळ्यात
महादेवीने कंपाऊंडर व डॉक्टरना ६० हजार दिलेले असल्याने आता हे बाळ जादा रकमेला विकण्यासाठी ती बेळगावात आली. याची कुणकुण माळमारुतीचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली.
पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला. बाळ विकण्यासाठी आलेल्या महादेवीला ताब्यात घेतल्यानंतर याची शेवटची कडी सापडली. त्यामुळे या प्रकरणात पाच जणांना अटक केली.
0 Comments