बेळगाव / प्रतिनिधी
बलिदानाचे प्रतीक असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र असा बकरी ईद हा सण बेळगाव शहरात आज शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अंजुमन - ए - इस्लाम इदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाज अदा करताना मुस्लिम बांधवानी जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
'ईद-उल-जोहा' हा सण इस्लामिक कालगणनेतील १२ व्या महिन्यात म्हणजेच अखेरच्या महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बलिदानाचे प्रतीक असलेल्या बकरी ईद सणाला (ईद-उल-जोहा) असेही म्हणतात. या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करून भक्ती दर्शवतात. मुस्लिम समाजासाठी हा आनंदाचा आणि उत्सवाचा काळ आहे. रमजान ईद (ईद-उल-फित्रच्या) दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते.
प्रत्येक मुस्लिम भाविक पवित्र महिन्यात हज पूर्ण करण्यासाठी मक्केला भेट देतात आणि नंतर ईद सण साजरा करतात. देशभरात साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी पहाटे मुस्लिम भाविक ईद निमित्त इदगाह मैदान आणि मशिदींमध्ये विशेष सामूहिक नमाज अदा करतात. बेळगावात मौलाना अब्दुल रझाक मोमीन, नईम खतीब यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुफरी अब्दुल अजीज काझी, जुहेर काझी यांनी सामूहिक नमाज अदा करून देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी प्रार्थना केली. सणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी देशात सलोखा रहावा आणि शांतता नांदावी अशी मनोकामना करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच इतर कोणालाही त्रास न देता सण साजरा करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ आणि त्यांचा मुलगा अमन सेठ यांनी सर्वांना 'ईद-उल-जोहाच्या' शुभेच्छा दिल्या. बेळगावात हिंदू - मुस्लिम एकत्र येऊन सण साजरा करत आहेत. तेव्हा बेळगावातील हिंदू - मुस्लिम नाते असेच कायम राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात हजारो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते.
0 Comments