\

दिल्ली : अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदांच्या निर्मितीसह अन्य मुद्द्यांवर विधाने करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजकीय संभ्रम निर्माण करत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. डी.के.शिवकुमार यांनी त्यांच्या दिल्ली भेटी दरम्यान ही तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राजण्णा यांच्यासारख्या मंत्र्यांना सावध करण्याची विनंती त्यांनी केली.

डी.के.शिवकुमार यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना शांत राहून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चिंता न करण्याचा सल्ला दिला. तसेच  मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकांच्या वक्तव्यावर भाष्य करू नये अशी सूचना केली. या प्रकरणी आपण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात काही दिवसांपासून अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदे निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी आमदार आणि मंत्र्यांना याबाबत इशारा देऊनही वक्तव्ये थांबलेली नाहीत. हा भाजप आणि जेडीएस पक्षासाठी टीकेचा मुद्दा बनला आहे.