बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका म. ए. समितीच्या पुर्नररचने संदर्भात रविवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शोध कमिटी रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना पुनर्चीत करून संघटना बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन तालुका म. ए. समितीची पुनर्चना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००९ साली एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका म. ए. समितीची पुनर्चना करण्यात आली होती. गेल्या २ ते ३ वर्षांपासून कार्यकर्त्यांतून पुनर्चनेसंदर्भात मागणी करण्यात येत होती. याबाबत २६ मे रोजी झालेल्या बैठकीत व्यापक बैठक घेण्याचा निर्णयही झाला होता. तसेच १ जून रोजी देखील यावर चर्चा झाली होती. 

भविष्यात समितीच्या प्रवाहात तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यानुसार आज झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या विचारातून १ शोध कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही कमिटी प्रत्येक गावोगावी जाऊन समिती कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहे. या माध्यमातून विस्तृत कार्यकारिणी, सुकाणू समिती, मध्यवर्ती सदस्य, निवड कमिटी साठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. कमिटीच्या माध्यमातून संघटित शक्ती एकत्र करून कर्नाटक सरकारच्या अन्यायी धोरणाविरोधात लढण्यासाठी बळ मिळणार आहे. कर्नाटक सरकारची कन्नड सक्ती आणि मराठी विरोधी धोरणाला प्रत्त्युत्तर द्यायचे असेल संघटना मजबूत असणे गरजेचे आहे. यासाठी हो शोधकमिटी मंगळवारपासून कामाला सुरुवात करणार असून गावोगावी जाऊन कार्य करणार असल्याचे मनोहर किणेकर म्हणाले. तसेच युवा आघाडी आणि महिला आघाडी कार्यान्वित करण्यासाठी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.