• म. ए. युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा - शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ

बेळगाव / प्रतिनिधी 

मातृभाषेतून शिक्षण काळाची ही काळाची गरज असून शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, मागील काही वर्षे युवा समिती शाळांसाठी कार्य करीत असून त्यांच्यासारखे कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवार दि. १३ जून रोजी कावळे संकुल टिळकवाडी, येथे आयोजित "सचित्र बालबोधिनी" अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रविकिरण प्रकाशनचे प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी मालोजी अष्टेकर पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात सर्व स्थरावर  सक्षम होतात, त्यामुळे न्यूनगंड न बाळगता सर्व पाल्यांनी मातृभाषेचा पर्याय निवडावा असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मालोजीराव अष्टेकर यांच्याहस्ते म. ए. युवा समिती सचित्र बालबोधिनी अंकलिपीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी मंडोळकर व उपस्थितांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी प्रशांत इनामदार यांनी आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे कारण बऱ्याच संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार गाजवून मराठीची पताका अटकेपार पोहचली असून त्याच मराठीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले. 

तर अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मागील सात वर्षे युवा समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली व येत्या शैक्षणिक वर्षात जवळपास ३०० शाळा व ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तसेच लवकरात लवकर शाळांनी पहिलीच  पटसंख्या द्यावी असे आवाहन केले.

यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, इंद्रजित धामनेकर, आशिष कोचेरी, आकाश भेकणे, साईराज जाधव, रोहित गोमानाचे, निखिल देसाई, महंतेश अलगोंडी, आश्वजीत चौधरी, भारत पाटील, अभिजित मजुकर, रितेश पावले, महेश जाधव, आनंद जाधव, प्रवीण धामनेकर सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, सुशील महांतुंगडे, सूरज चव्हाण, आदी उपस्थित होते. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले तर कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी आभार मानले.