बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्ही कधीही विसरणारं नाही, असे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. गुरूवारी बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार शेट्टर पुढे म्हणाले, बेळगाववासियांनी या निवडणुकीत जगदीश शेट्टर यांची ताकद राज्याला दाखवून दिली आहे. बेळगावकरांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणारं नाही, असे त्यांनी सांगितले. 

बेळगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. सर्व विधानसभा मतदान केंद्रांवर स्वर्गीय खा. सुरेश अंगडी यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे झालेला माझा विजय हा जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे सांगून त्यांनी या जनतेला विजयाचे श्रेय दिले. आमदार अभय पाटील यांच्या बेळगाव दक्षिण मतदार संघात ७१ हजाराचे मताधिक्क्य तसेच गोकाकमध्येही मोठे मताधिक्क्य मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

आज मी बेळगाव विमानतळावर जाऊन बैठक घेणार आहे त्यानंतर उद्या डीसी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देत बेळगाव ते धारवाड थेट रेल्वे प्रकल्प समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला खासदारपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळो किंवा न मिळो, आपण आपली जबाबदारी पार पाडणार आहोत. हुबळीमधील जगदीश शेट्टर आणि बेळगावमधील जगदीश शेट्टर यांच्यात फरक असल्याचेही ते म्हणाले... स्मार्ट सिटीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाची पाहणी करेन असे ते म्हणाले. कळसा - भांडुरा प्रकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, म्हादईतून १३ टीएमसी पाणी मिळणार असून याबाबत पर्यावरण विभाग आणि वन्यजीव मंडळाकडून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.