- पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्रींची प्रार्थना
बेळगाव / प्रतिनिधी
पतीला दीर्घायुष्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करत, बेळगाव तालुक्यात वटवृक्षांचे पूजन करून शुक्रवारी वटपौर्णिमा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने साड्या नेसून, साजश्रुंगार केलेल्या तरुण, प्रौढ अशा सर्व वयोगटातील सुवासिनी महिला आनंदाने, उत्साहात वटवृक्षाची पूजा करताना दिसून आल्या.
ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी, पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पौर्णिमेला हिंदू धर्मात महिलांच्या दृष्टीने खुप महत्व आहे. याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवानाचा प्राण यमदेवतेकडून परत मिळविला अशी कथा पुराणात आहे. वटपौर्णिमेनिमित्त पतीचे आरोग्य व स्वास्थासाठी प्रार्थना आणि पूजन करण्यात येते. ही परंपरा अजूनही जोपसली जात आहे.
दरम्यान बेळगाव तालुक्याच्या सुळगा (हिं.) गावातही वटपौर्णिमेचा उत्साह दिसून आला. सुवासिनींनी सकाळपासूनच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन केले होते. आंबा, जांभूळ, सफरचंद, केळी, फणस आदी पाच फळे, हळदीकुंकू असलेले तबक घेऊन महिलांनी वडाच्या झाडांपाशी गर्दी केली होती.
काही महिलावर्ग आपल्या पतिराजांसमवेतच उपस्थित असल्याचे दिसून आले. तर काही महिला आजी, आई, सासू अशा पिढ्यांसह एकत्रित वटपौर्णिमेचे व्रत करताना दिसत होत्या.
गावात ज्याठिकाणी वडाची झाडे आहेत, त्याठिकाणी महिलांची पूजेसाठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एका नवविवाहितेसह अन्य महिलांनी, आपल्या भावना व्यक्त करताना वटपौर्णिमा सणाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले.
- शहर परिसरात वटपौर्णिमेचा उत्साह :
बेळगाव शहर आणि परिसरातही विविध ठिकाणी महिलावर्गाने वटवृक्षाची पूजा केली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा,असे साकडे घालत वटवृक्षाच्या झाडाला सुवासिनी नटून-थटून आपल्या पतीराजाच्या आयुष्यासाठी साकडे घालताना दिसत होत्या.
विशेषतः कपिलेश्वर मंदिरनजीक असलेल्या वटवृक्षाच्या पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण हे व्रत कशासाठी करतो याबद्दल अनेक महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी पारंपरिक सण जपत असल्याचे सांगितले तर काहींनी पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभू देत यासाठी आपण प्रार्थना केल्याचे सांगितले. तर काही काही महिलांनी हिंदू संस्कृतीतील परंपरा आणि चालत आलेल्या रितीरिवाजानुसार आपण हा सण साजरा करत असल्याचे सांगितले. सुवासिनी देवाकडे सौभाग्याचे लेणे मागण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. खरंतर यामागे शास्त्रीय संदेशही आहे. वटवृक्ष हा भरपूर प्राणवायू देणारा वृक्ष आहे. त्यामुळे त्याच्या सानिध्यात रहा, वृक्षारोपण करा, झाडे लावा अन जगवा हा संदेश देण्यासाठी या व्रताला धार्मिक रूप देऊन त्याचे आचरण केले जाते अशी माहिती त्यांनी दिली.
आवर्जून नेसलेली भरजरी साडी, सोबत दागिन्यांचा शृंगार करत अनेक महिलांनी वडासोबत सेल्फी घेत नातलग, मैत्रिणींसह सोशल मीडियावर शेअरही केली. नवविवाहित महिलांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा होता. यामुळे बहुसंख्य नवविवाहितांना सेल्फी आणि रिल्सचा मोह आवरता आला नाही. गुरुवारी सायंकाळी अचानक सुरु झालेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी उघडीप दिल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत होते.
एकंदरीत पती - पत्नीचे नाते दृढ करणारा वटपौर्णिमेचा सण महिलांनी परंपरा जोपासत उत्साहात साजरा केला.
- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.. 👇
0 Comments