- पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांची माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या आरपीडी ज्यु. कॉलेजमध्ये उद्या दि. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी वाहनांसाठी पर्यायी मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत.
मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांनी भाग्यनगर दुसरा क्रॉस मार्गे, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी ओलांडून, डावीकडे वळण घेऊन वाहने मँगो गार्डन गेटमार्गे आरपीडी कॉलेज मैदानावर पार्क करावीत तसेच आरपीडी कॉलेजच्या पहिल्या गेटमधून आत जाणाऱ्यांनी त्यांची वाहने केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात पार्क करावीत.
एजंट गोमटेश हायस्कूल, हिंदवाडी शाळेच्या मैदानात त्यांची वाहने पार्क करू शकतात आणि मतमोजणी केंद्रापर्यंत चालत जाऊ शकतात.
गोकाक, अरभावी, भागातून येणारे लोक लेले मैदान आणि व्हॅक्सिन डेपो मैदानावर त्यांची वाहने पार्क करू शकतात. बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती यल्लम्मा भागातून येणाऱ्यांनी आपली वाहने ग्रामीण पोलिस स्थानकाच्या डाव्या बाजूला आदर्श नगर शाळेच्या मैदानात, जुना पीबी रोड, नाथ पै सर्कल मार्गे वडगाव परिसरात किंवा आदर्शनगर रोडच्या पुढे पार्क करू शकतात. तर बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण भागातून येणाऱ्यांना तिसऱ्या रेल्वे गेटपासून पिरनवाडी पर्यंत रस्त्यानजीक वाहने पार्क करता येतील.
सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत गोवावेस, आरपीडी रोड, गुरुदेवरानडे रोड, पहिला आणि दुसरा रेल्वे गेट रोड, अनगोळ रोड आणि भाग्यनगर रोडवर वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. गोवावेस सर्कलकडून आरपीडी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी महावीर भवनजवळ डावीकडे वळण घेऊन भाग्यनगर १० व्या क्रॉस मार्गे गुरूदेव रानडे रोड, भगतसिंग गार्डनच्या पुढील रस्ता, आदर्शनगर, वडगाव परिसरात अनगोळरोड हरीमंदिर क्रॉसकडे जावे.
नो - पार्किंग झोन : खानपूर रोडच्या दोन्ही बाजूला गोवावेस सर्कल ते अनगोळ क्रॉसपर्यंत पार्किंग प्रतिबंधित आहे आणि जनतेने वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या वेळी अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांनी मोबाईल फोन, पान, विडी, गुटखा, शाईपेन, कॅमेरा, फायर पॅक, लायटर, प्लास्टिकच्या वस्तू आणि ज्वलनशील वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आली आहे.
0 Comments