- १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी - २० विश्वचषकावर कोरले नाव
- अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा ७ धावांनी पराभव
बार्बाडोस : भारतीय संघाने १७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत टी - २० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. शेवटच्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. विराट कोहलीच्या ७६ धावा आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने ५२ धावांची वादळी खेळी केली. पण हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचने सामना पलटवला आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला.
२००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला.
टीम इंडियाने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान पार करताना दक्षिण अफ्रिकेची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम स्वस्तात परतले. त्यानंतर मात्र, क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव सांभाळला अन् टीम इंडियाला बॅक फूटवर नेले. तर स्टब्ल बाद झाल्यानंतर आलेल्या हेन्रिक क्लासेनने मैदानात वादळ उठवले. त्याने अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची गोलंदाजी फोडून काढली. अखेर हार्दिक पांड्याने क्लासेनचे वादळ शांत केले. अखेरच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती.
प्रारंभी नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या रोहित आणि विराटने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरूवात करून दिली. पण नंतर दक्षिण अफ्रिकेच्या केशव महाराजने टीम इंडियाला दोन धक्के दिले. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकामागोमाग बाद झाले. सूर्या देखील लगेच तंबूत परतल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. तर विराट कोहलीने एक बाजू राखून धरली. अक्षरने काही खराब बॉलवर दांडपट्टा चालवला. तर विराटने धावसंख्या चालवली. विराट कोहलीने ५९ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. तर अक्षरने ३१ बॉलमध्ये ४७ धावा कुटल्या. अक्षर धावबाद झाल्यानंतर शिवम दुबेने काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने टीम इंडियाची धावसंख्या १७६ धावांवर पोहोचवली.
0 Comments