- कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा नोंदवला निषेध
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकातील काँग्रेस राज्य सरकारने वाल्मिकी महामंडळाच्या १८७ कोटी रुपये निधीचा गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहाराचा निषेध करत बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तत्पूर्वी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान काँग्रेस राज्य सरकार व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
राज्य काँग्रेस सरकारने, वाल्मिकी महामंडळाच्या १८७ कोटी रुपये निधीचा गैरवापर केला आहे. वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याशी निगडित असलेले माजी मंत्री नागेंद्र यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी यावेळी भाजप नेत्यांनी केली.
आंदोलना दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले, गेल्या एक वर्षापासून राज्यातील काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. काँग्रेस हमीभावाच्या नावाखाली राज्यातील जनतेची फसवणूक करत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार भ्रष्टाचारात असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, वाल्मिकी महामंडळात गरीब विद्यार्थ्यांसाठी निधी देण्यात आला आहे. १८७ कोटींच्या घोटाळ्याचा राज्य सरकारवर आरोप करून एका प्रामाणिक अधिकाऱ्याने आत्महत्या केली, नागेंद्रचे नाव अधिकाऱ्याच्या पत्रात असतानाही एफआयआर नोंदवला गेला नाही, असा संताप व्यक्त केला. त्यानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाल्मिकी महामंडळाच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वाना शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिले.
या आंदोलनात माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, सुभाष पाटील, मुरुगेंद्र गौडा पाटील, एम.बी.जिरली, माजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा सहभागी झाले होते.
0 Comments